सायबर सुरक्षेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

सायबर सुरक्षेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

  ऑक्टोबर महिना हा "वर्ल्ड सायबर सिक्युरीटी अवेअरनेस मंथ " म्हणून गणला जातो.  जिल्ह्यामधील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेतील विदयार्थी जे मोबाईल इंटरनेटचा जास्त वापर करतात. देशाच्या भावी पिढीला "सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस" बाबत अवगत करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. जेणेकरून तरूण पिढी स्वत:चे व आपल्या परीवाराचा संभाव्य सायबर गुन्ह्यांपासून काही प्रमाणात बचाव करु शकतील. यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलीस दल व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) सिंधुदुर्ग यांनी एकत्रितपणे दि. १६ ऑक्टोंबर ते  ३ नोव्हेंबर २०२३ रोजीचे मुदतीत "सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस" या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा व विद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
    या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील  २५८ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रत्यक्ष जावून तेथील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेसबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील शेवटच्या गावापर्यंत पोहचून सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमामार्फत करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यामधील सर्व सायबर कॅफे व  कम्प्युटर इंस्टयुटूस, समाजाशी कायम संपर्कात राहणाऱ्या पोलीसांनासुध्दा तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
    शासनाने कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पोलीस काका, दिदी, जागरुक नागरीक, त्याचप्रमाणे स्टुडंट पोलीस केडर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, नागरीक यांच्यामध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी वेळोवेळी उपक्रम राबविले आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. भारतात प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्यावरून ऑनलाईन बँकींग ट्रान्झॅक्शन करण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. स्मार्ट मोबाईल फोन वापरताना लहान, किशोरवयीन मुले, तरुण, तरुणी, गृहीणी यांनी ते मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी. जेणेकरून ऑनलाईन होणारे फ्रॉड थांबतील तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करता येईल व नागरीकांची होणारी फसवणूक देखील कमी होईल, यासाठी सायबर सिक्युरीटी व जनरल अवेरनेसबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यात जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे.
    या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शाळा कॉलेज मधील ५० हजारा पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांशी  प्रत्यक्ष संवाद साधून, प्रश्नमंजुषा, पोस्टर्स इत्यादी माध्यमादवारे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ५० हजारापेक्षा जास्त कुटूंबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. विद्यार्थी सोबतच त्यांना शिक्षण देणाऱ्या सुमारे २ हजार ५०० शिक्षकांना सायबर सुरक्षेबाबतचे धडे गिरविण्यात आले. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी सायबर सुरक्षेबाबत स्वत: जागरुक राहून समाजाचे रक्षण करण्याबाबत शपथ घेण्यात आली.
    या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामधील (मुख्या.) पोलीस उपअधीक्षक कविता गायकवाड, पोलीस उपअधीक्षक किशोर सावंत,  आर्थिक गुन्हे शाखाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव तसेच १३ पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा व मानव संसाधन शाखा इत्यादी शाखांचे २०० अधिकारी व अंमलदार सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) सिंधुदुर्गचे प्रणय तेली व त्यांच्या ६० सभासदांनी या कार्यक्रमामध्ये पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून काम करून हा उपक्रम यशस्वी केलेला आहे.