मालवण येथील मोफत आयुष्मान कार्ड विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण.
येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने मोदी@9 अभियाना अंतर्गत मालवण शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत 'आयुष्मान कार्ड विशेष शिबिराना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ताम्हणकर फिशिंग सेंटर तसेच हॉटेल महाराजा येथे घेतलेल्या शिबिरालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत महिन्याभरात चार वेळा घेतलेल्या शिबिराचा ३०० जणांनी लाभ घेतला आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. ५ लक्ष वैद्यकीय संरक्षण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. १.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रु.२.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण) प्रति कुटुंब, प्रति वर्ष देण्यात येते. हे आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून मालवण मध्ये विशेष शिबीर घेण्यात येत आहेत.
ही योजना २०१८ मध्ये आल्यानंतर आजपर्यंत पाच वर्षात मालवण शहरात केवळ १८० जणांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने महिन्याभरात तिनवेळा आयोजित केलेल्या या शिबिरांमध्ये ३०० हून अधिक जणांनी नोंदणी करून घेतली आहे. आज शनिवारी देऊळवाडा येथे घेण्यात आलेल्या या शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यासह मालवणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांना हे कार्ड काढण्यासाठी बाजारपेठेत येताना अडचणी निर्माण होत आहे. ही अडचण विचारात घेऊन शहरातील विविध वॉर्डात जाऊन हे शिबीर आगामी काळातही घेतले जाणार आहे.