मालवण येथे ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली कार्यशाळा संपन्न.

मालवण.
ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सिंधुदुर्ग आणि नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने नगर वाचन मंदिर येथे ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मान्यवरांकडून मार्गदर्शनासह ग्रंथालय वार्षिक अहवालाबाबत प्रत्यक्षिके दाखविण्यात आली.
या कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून श्री देवी सरस्वती व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, निगमन सहाय्यक प्रतिभा वाटे, ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष प्रकाश कुशे, मालवणी कवी रिजारिओ पिटो. डॉ. सुभाष दिघे आणि ग्रंथालयाचे कार्यवाह प्रा. नागेश कदम, ग्रंथापाल संजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. नागेश कदम यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर ग्रंथपाल संजय शिंदे यांनी प्रास्ताविक करत उच्च आणि तंत्रशिक्षण सचिवांनी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ डिजिटल करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे, त्याचाच एक भाग म्हणून ग्रंथालयांचे कामकाज यापुढे पेपरलेस होणार आहे. ग्रंथालय चळवळीसाठी ही एक क्रांती म्हणावी लागेल, असे सांगितले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रतिभा ताटे यांनी ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल ऑनलाईन पध्दतीने कसा भरावा याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दिले. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये मालवण तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाच्या संगणकावर वार्षिक अहवाल भरण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यशाळेस मालवण तालुक्यातील २० सार्वजनिक ग्रंथालयांचे ३५ पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार ग्रंथपाल संजय शिंदे यांनी मानले.