मळगावचे दशावतार कलाकार रमेश शिरोडकर यांना गोव्यात 'राष्ट्रीय पुरस्कार'
सावंतवाडी
कोकणची लोककला असलेल्या दशावताराला सातासमुद्रापार नेणारे आणि आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील सुपुत्र रमेश अंकुश शिरोडकर यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. गोव्यातील कला व संस्कृती भवन येथे आयोजित 'राष्ट्रीय लोकगौरव सन्मान परिषदेत' त्यांना मान्यवरांच्या हस्ते 'राष्ट्रीय दशावतार कलाकार पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.आर्ट्स, टुरिझम ॲण्ड कल्चर फेस्टिव्हल समिती आणि श्री नागेश महारुद्र फाउंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि या कलेचा प्रचार करण्यासाठी रमेश शिरोडकर यांनी दिलेल्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. रमेश शिरोडकर यांच्या कलाप्रवासाची सुरुवात मळगाव येथील 'सुयोग दशावतार नाट्यमंडळा'तून झाली. आपल्या पहिल्याच 'कांचनगंगा' नाटकात त्यांनी राणी लक्ष्मी आणि गंगा या दोन आव्हानात्मक स्त्री भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर त्यांनी बाबी कलिंगण यांचे कलेश्वर दशावतार मंडळ, मामा मोचेमडकर, खानोलकर, यक्षिणी (माणगाव), ओमकार नटेश्वर (कालेली) अशा अनेक दिग्गज नाट्यमंडळांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विशेषतः त्यांच्या स्त्री भूमिका अत्यंत प्रभावी ठरल्या, तर काही प्रसंगी त्यांनी पुरुष भूमिका देखील तितक्याच ताकदीने निभावल्या आहेत.
konkansamwad 
