जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या.....आता 'या' तारखेला मतदान
मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने बुधावारी शासकीय सुट्टी जाहीर केली होती. शिवाय तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे निवडणुकांच कामकाज आणि प्रचाराला वेळ मिळावा, यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी होणारी मतदानाची प्रक्रिया आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी पार पडेल. एवढा बदल निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला आहे.राज्यामध्ये १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. बुधवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. पूर्वी प्रचारासाठी सात दिवसांचा वेळ मिळणार होता, परंतु दुर्दैवी घटनेमुळे आणि शासकीय दुखवट्यामुळे तो चार दिवसांचा मिळाला असता. त्यामुळे दोन दिवस निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल.निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

konkansamwad 
