'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेबाबत आवश्यक दाखले वेळेवर द्या. वेंगुर्ला तालुका महिला मोर्चा तर्फे तहसीलदारांना निवेदन.
वेंगुर्ला.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेबाबत वय अधिवास व उत्पन्नाचे दाखले वेळेवर मिळणेबाबत वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चामार्फत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा होण्याच्या उद्देशाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना सुरू केल्याबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभार मानण्यात आले. दरम्यान, या योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याकरीता लागणारा घरपत्रक उतारा व वय अधिवास काढण्याकरीता जन्माचा दाखला १५ दिवसांत मिळणे अशक्य आहे. त्यामुळे हे दाखले लवकरात लवकर लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी निवदेनाद्वारे केली आहे.
तसेच दाखले सादर करतेवेळी तहसिल कार्यालयात लाईट नसणे, डेस्कवर दाखले भरण्यास अधिकारी नसणे किवा इंटरनेटचा प्रॉब्लेम किवा कॉम्प्युटर नसणे अशा अनेक कारणांमुळे शैक्षणिक दाखल सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. तरी दाखले मिळण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी विशेष यंत्रणा राबविण्यात यावी. जेणेकरून योजनेतील महिलांना सतत हेलपाटे मारावे लागणार नाही असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी महिला मोर्चाच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा प्रभूखानोलकर व वृंदा गवंडळकर, तालुका महिला कार्यकारिणी सदस्य जानवी कांदे, शहर महिला अध्यक्ष श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस आकांक्षा परब, पाल सरपंच कावेरी गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल पालकर, तालुका महिला उपाध्यक्ष श्रद्धा धुरी, शहर सरचिटणीस रसिका मठकर व प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी तालुका कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी वेंगुर्ला तालुक्यात आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्यासाठी ६६ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आणि २०२४ च्या पावसाळी अधिवेशानात प्रामुख्याने महिला, विधवा, दिव्यांग, वृद्ध, शेतकरी या प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिला त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुन्हा एकदा आभार मानण्यात आले.