भारत संचार निगम लिमिटेडची सेवा वारंवार ठप्प; आंदुर्ले ग्रामस्थांची तीव्र नाराजी

भारत संचार निगम लिमिटेडची सेवा वारंवार ठप्प; आंदुर्ले ग्रामस्थांची तीव्र नाराजी

आंदुर्ले


    आंदुर्ले गावातील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची मोबाईल सेवा मागील अनेक दिवसांपासून वारंवार ठप्प होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नेटवर्क नसल्यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, स्थानिक पातळीवर आवश्यक यंत्रणा व सक्षम मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी सेवा तात्काळ सुरळीत करणे कठीण जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.गावातील अनेक वयोवृद्ध नागरिक अजूनही कीपॅड मोबाईलचा वापर करतात आणि नियमितपणे मासिक रिचार्ज भरतात. सेवा वारंवार खंडित होत असल्याने त्यांच्या पैशांचे नुकसान होत आहे. याशिवाय बँक व्यवहार, शासकीय योजना, आरोग्यविषयक संपर्क आणि आपत्कालीन परिस्थितीत संवाद साधण्यासाठी मोबाईल सेवा अत्यावश्यक ठरत आहे. अशा वेळी नेटवर्क बंद राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे.ग्रामीण भागात दूरसंचार सेवा सक्षम ठेवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी आंदुर्ले ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे