११ वर्षांनंतरही सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रखडले....कोकणवासीयांत नाराजी
सावंतवाडी
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आज (२७ जून) तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न गेल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २७ जून २०१५ रोजी मोठ्या उत्साहात या टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही प्रकल्प रखडल्याने प्रवाशांना अपेक्षित सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत.कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या, विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता सावंतवाडीत स्वतंत्र रेल्वे टर्मिनस उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. टर्मिनस कार्यान्वित झाल्यास कोकणासाठीच्या विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होईल, असा नागरिकांचा विश्वास आहे.दरम्यान, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे 'लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस' असे नामांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून, त्यास अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, नामांतराच्या प्रक्रियेसोबतच रखडलेल्या टर्मिनस प्रकल्पालाही तातडीने गती देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे प्रवासी संघटना व कोकणप्रेमींनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ई-मेल मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी अधिक विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या गाड्यांसाठी सावंतवाडीत हक्काचे रेल्वे टर्मिनस उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. नागरिकांनी आता केवळ आश्वासनांवर न थांबता प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
konkansamwad 
