सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून विकास संस्थांच्या सक्षमीकरणावर भर – मनीष दळवी....७ दिवसांत बिगर शेती कर्ज आणि सचिवांना वर्षाला ९० लाखांचा निधी
सावंतवाडी
विकास सहकारी संस्थांना अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संस्थांच्या पाठीशी बँक खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी सावंतवाडीतील मंगिरीश हॉलमध्ये आयोजित 'प्राथमिक विकास संस्था संवाद' कार्यक्रमात व्यक्त केला. विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी बँकेने गेल्या पाच वर्षांत प्रत्येक संस्थेला दरवर्षी २० हजार रुपये व्यवस्थापन खर्च, सचिवांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स आणि उत्तम वसुलीसाठी बक्षीस योजना राबवली असल्याचे सांगून संस्थांच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी १४४ सचिवांच्या वेतन फरकापोटी ९० लाखांपेक्षा जास्त असणारी रक्कम संचालक मंडळाच्या मंजुरीने पुढील पाच वर्षे दरवर्षी ९० लाख रुपये बँक स्वतःच्या नफ्यातून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच शेती व बिगर शेती कर्जासाठी लागणारा ९० ते १०० दिवसांचा कालावधी कमी करून नवीन प्रणालीद्वारे बिगर शेती कर्ज अवघ्या ७ दिवसांत मंजूर केले जाईल असेही ते म्हणाले. संस्थांच्या पायाभूत सुविधांसाठी नाबार्डच्या ४ टक्के व्याजदर योजनेअंतर्गत गोदाम बांधकामासाठी मिळणाऱ्या ४० लाखांपर्यंतच्या कर्जावरील १ टक्का व्याजही जिल्हा बँक स्वतः भरणार असून त्यामुळे संस्थांना हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. सध्या जिल्ह्यात २२ हून अधिक संस्थांमध्ये गोदामांचे बांधकाम सुरू आहे आणि पीक विमा योजनेत आंबा, काजू आणि भातासोबत आता सुपारी व नारळ पिकांचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात ३० जून २०२६ अखेर बँकेच्या कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, कोलगाव, स्थापेश्वर डेगवे, भावई क्षेत्रपाल कुणकेरी, आरोस, वाफोली, सातार्डा, वेत्ये, चराठे, देवसू, चौकुळ, मळेवाड, शिरशिंगे, वेर्ले, बांदा, इन्सुली, आजगांव, माडखोल, कारिवडे आणि माजगांव या २० विकास संस्थांचा विशेष सत्कार बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रविंद्र मडगांवकर, विद्याधर परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी संचालक गुरूनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, गजानन सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
