पडवे-माजगावात वाघाच्या हल्ल्यात गाभण गाईचा मृत्यू
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील पडवे-माजगाव परिसरात वाघाने गाभण गाईवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक अरुण भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाय चारण्यासाठी घेऊन गेले होते. काही वेळाने ते घरी भाकरी खाण्यासाठी परतले. दरम्यान इतर जनावरे गावाकडे परत आल्याचे त्यांना समजले. त्यांनी शोध घेतला, मात्र संबंधित गाय रात्रीपर्यंत सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध घेतला असता गाय मृतावस्थेत आढळून आली आणि तिच्यावर वाघाने हल्ला करून ती फस्त केल्याचे निदर्शनास आले. पडवे-माजगाव परिसरात यापूर्वीही वाघ तसेच अस्वलांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पाहणी करावी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
konkansamwad 
