सहकाराची दिशा देणाऱ्या शिवरामभाऊंचा पायंडा कुडाळच्या विकास संस्थांनी पुढे नेला - मनीष दळवी
कुडाळ
सहकार क्षेत्राला सक्षम आणि शिस्तबद्ध दिशा देण्याचे काम सिंधुदुर्गचे ज्येष्ठ सहकार नेते शिवरामभाऊ जाधव यांनी केले. त्यांनी घालून दिलेला सहकाराचा पायंडा कुडाळ तालुक्यातील प्राथमिक विकास संस्थांनी पुढे नेला आहे. तालुक्यातील शेतकरी वेळेत व्याजासह कर्जाची परतफेड करीत असल्याने कुडाळ तालुक्याचे सहकार क्षेत्रात जिल्ह्यात अग्रगण्य स्थान निर्माण झाले आहे. विकास संस्थांच्या पदाधिकारी, संचालक व सचिवांनी घेतलेली मेहनत आणि शेतकऱ्यांनी दाखविलेली आर्थिक शिस्त निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल सभागृहात मंगळवारी कुडाळ तालुका प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण, मार्गदर्शन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ३० जून २०२६ अखेर वसुलपात्र बँक कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील ३४ विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांचा गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मनीष दळवी म्हणाले, सहकार क्षेत्राची त्रिसूत्री म्हणजे विकास संस्था, जिल्हा बँक आणि राज्य बँक होय. या त्रिसूत्रीमध्ये विकास संस्था हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून चालणारी विकास संस्था ही शेतकऱ्यांची आर्थिक केंद्रे बनली पाहिजेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून संस्थांचे कामकाज संगणकीकृत करून त्यामध्ये पारदर्शकता आणली जात आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना आवश्यक कर्जासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम सुरू आहे. त्यामुळे संस्थांच्या अध्यक्ष व संचालकांनी संस्थांच्या वाढीसाठी अधिक वेळ देऊन सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. विकास संस्थांच्या प्रगतीमध्ये सचिवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सचिवांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बँकेनेही सचिवांच्या मानधनाचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून, बँकेच्या नफ्यातून सचिवांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली. शेतकऱ्यांना संस्थांच्या माध्यमातून आवश्यक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी विविध योजनांचा विस्तार करण्यात येत आहे. बळीराजा कृषी योजनेच्या माध्यमातून बिगरशेती क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच विविध नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. विकास संस्थांनी केवळ शेती व बिगरशेती कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता सर्व प्रकारच्या कर्ज व्यवसायाचा विस्तार करावा. संस्थांच्या वाढीसाठी शासनाने विविध कर्ज व्यवसायाची परवानगी दिली असून, बँकांच्या तुलनेत कमी व्याजदराचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न संस्थांनी करावा, असेही त्यांनी सांगितले. विकास संस्थांनी स्वतःची जागा उपलब्ध करून गोडाऊन उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. गोडाऊन उभारणीसाठी शासनाकडून बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, संस्थांनी त्याचा लाभ घ्यावा. कुडाळ तालुक्यातील पाट विकास संस्थेने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून स्वतःची इमारत उभी केली आहे. या संस्थेच्या प्रयत्नांचेही दळवी यांनी कौतुक केले. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने विकास संस्थांच्या माध्यमातून भात खरेदी केली जाते, त्याच धर्तीवर आगामी काळात काजू खरेदीही विकास संस्थांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. काजू खरेदी-विक्रीचे व्यवहार संस्था पातळीवरच झाल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि संस्थांनाही होईल. त्यामुळे तालुक्यातील विकास संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनीष दळवी यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक बाबा गावडे, कर्ज विभाग प्रमुख के. बी. वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी शाम सरमळकर, विकास अधिकारी निलेश कनयाळकर, संजय परब आदी उपस्थित होते. कुडाळ तालुक्यातील गटसचिवांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करून अभिनंदन केले. ३० जून २०२६ अखेर वसुलपात्र बँक कर्जाची १० टक्के वसुली करणाऱ्या तेंडोली, माणगाव, कर्याद नारूर, नारूर, नेरूर, आंदुर्ले, घोटगे, निवजे, पाट, कुडाळ पंचक्रोशी, पणदूर-वेताळ बांबार्डे, कडावल, नेरूर दक्षिण भाग, माड्याचीवाडी, श्री लिंगेश्वर सोनवडे, कसाल, हिर्लोक, सरंबळ, हुमरमळा, झाराप, डिगस, आकेरी, बांबुळी, तुळसुली, चेंदवण, वालावल कृषी संघ, श्री महादेव कवठी, घावनळे, वालावल, वाडीवरवडे, साळगाव, श्री महादेवाचे केरवडे, पांग्रड आणि आवळेगाव या विकास संस्थांचा गौरव करण्यात आला. तसेच संस्था स्तरावर शंभर टक्के वसुली केलेल्या वाडीवरवडे विकास संस्थेचाही विशेष गौरव करण्यात आला. संबंधित संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांचा सत्कार मनीष दळवी, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये व आत्माराम ओटवणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. एकाच छताखाली सहकाराच्या माध्यमातून विविध वस्तू आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाभरात 'सहकार बाजार' भरविण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असून, ग्राहकांनाही दर्जेदार व सेंद्रिय उत्पादने मिळण्यास मदत होईल. विकास संस्थांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सहकार बाजाराच्या माध्यमातून संस्थांना नवीन व्यवसायाची संधी मिळणार असून, शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट दुवा मजबूत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील विकास संस्थांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
konkansamwad 
