सर्वोदय नगर रहिवासी संघाचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

सर्वोदय नगर रहिवासी संघाचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

 

सावंतवाडी

 

       सर्वोदय नगर रहिवासी संघाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आयोजित स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. सायंकाळी 6.30 ते रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नव-नियुक्त उपनगराध्यक्ष श्री. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नव-नियुक्त नगरसेवक श्री.अजय गोंदावळे, सौ. नीलम नाईक, सौ. टोपले, तसेच माजी नगरसेवक श्री. परिमल नाईक उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सर्वोदय नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव- सौ. मेघना राऊळ, महिला संघाच्या अध्यक्षा सौ. दिशा कामत, महिला सचिव- सौ. शरयू बारदेस्कर, श्री. गुरुदत्त कामत, श्री. संभाजी नाईक, श्री. विद्याधर तावडे, श्री. तानाजी पालव, श्री. रुजुल पाटणकर श्री. कालकुंद्रिकर सर, श्री. काका परब, श्री. गुंडू साटेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
     कार्यक्रमाची एकूण मांडणी, एकोप्याचे दर्शन व उत्कृष्ट नियोजन याबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना श्री. अनिल निरवडेकर यांनी पुढील काळात सर्वोदय नगर रहिवासी संघाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे संघटन बळकट होते, शहरात एकोपा निर्माण होतो आणि विकासाची प्रक्रिया गतिमान होते, असे त्यांनी सांगितले. सर्वोदय नगर हे सावंतवाडीसाठी एक आदर्श उदाहरण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात महिला संघटनेच्या सक्रिय योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. आजच्या काळात स्त्रीशक्ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले, असे मत व्यक्त करण्यात आले.उद्घाटन व सत्कारानंतर लहान मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम— फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य आदी— सादर करण्यात आले. या विविध स्पर्धांचे परीक्षण प्रा. कराड सर, सौ. सुरेखा नाईक, गोठोस्कर, राणे सर, सौ. अमृता साटेलकर, बुवा सर आणि योगीश कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांची गाण्यांची मैफल व कराओके यामुळे कार्यक्रमात अधिकच रंगत वाढली. या कार्यक्रमाची प्रसिद्धीची जबाबदारी श्री. रुपेश पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.तर छायाचित्रणाची जबाबदारी निनाद नाईक व सबिना यांच्या टीमने सांभाळली.कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन सौ. मिलन पेडणेकर आणि सौ. मेघना राऊळ यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश नेरूरकर यांनी केले. रात्री उशिरापर्यंत सर्वांनी एकत्र येत स्नेहभोजनाचा आनंद घेत सर्वोदय नगरमधील सर्व रहिवाशांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करत हा स्नेहसंमेलन सोहळा यशस्वी केला.