गणेश घाटासाठी निधी आमदार निलेश राणेंमुळेच, श्रेय लाटण्याचा प्रयत्न अयोग्य - प्राजक्ता बांदेकर
कुडाळ
गणेश घाटाच्या कामाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा सुरू असलेला प्रयत्न म्हणजे "काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे," अशा मानसिकतेचा प्रकार असल्याची टीका कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केली आहे. गणेश घाटाचे काम मंजूर असणे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे या दोन वेगळ्या गोष्टी असून केवळ मंजुरीचे कागद दाखवून विकासकामे पूर्ण होत नसल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. प्रसिद्धी पत्रकात त्या म्हणाल्या की, गणेश घाटाचे काम निधीअभावी काही काळ रखडले होते, मात्र आमदार नीलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या कामासाठी आवश्यक निधी नगरपंचायतीला उपलब्ध झाला आणि त्यानंतर कामाला गती मिळाली. गेल्या सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष म्हणून स्वतः या कामावर लक्ष ठेवून अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला, अडचणी दूर केल्या आणि काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला. गणेश घाटाचे काम आता अंतिम टप्प्यात असताना अचानक स्थळ पाहणी करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष काम कोणी केले आणि निधी कोणी उपलब्ध करून दिला हे कुडाळकरांच्या डोळ्यांसमोर आहे, असा टोला त्यांनी लगावला. मागील दहा वर्षे सत्तेत असतानाही माजी आमदारांना कुडाळ शहरासाठी भरीव विकासकामे करता आली नाहीत आणि आता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी असे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. गणेश घाटाचे डिझाइन साधे, आकर्षक आणि कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असून काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देत २१ व्या शतकातील आधुनिक, सुंदर आणि विकसित कुडाळ घडवण्याचा दिलेला शब्द आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
konkansamwad 
