कणकवलीत गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड....५५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त....आयशर टेम्पोसह चालक ताब्यात
कणकवली
कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालच्या पथकाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूची मोठी तस्करी उघडकीस आली आहे. या प्रकरणात 55 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 2/08/2026 रोजी दुपारी 3.55 वाजता मानाने, तळेरे औदुंबर नगर येथे गोवा ते मुंबई महामार्ग क्रमांक 66 वर कसूरदर वाहनांवर कारवाईसाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शांताराम गवस व त्यांचे पथक तैनात होते. त्यावेळी गोवा बाजूने मुंबईच्या दिशेने जाणारा MH 42 BU 1250 क्रमांकाचा लाल रंगाचा आयशर मालवाहू टेम्पो संशयास्पदरित्या दिसल्याने पथकाने तो थांबवला. तपासणी केली असता टेम्पोमध्ये गोवा बनावटीची दारूने भरलेले 800 खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिलीच्या 48 प्लास्टिकच्या कंपनी सीलबंद बाटल्या होत्या. प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे दारूची किंमत सुमारे 38 लाख 40 हजार रुपये आहे. पोलिसांनी टेम्पो आणि दारूसह चालक नितीश रमेश तांबोसकर वय 37 वर्ष, रा. चराठे टेंबवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग याला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या टेम्पोची किंमत 17 लाख असे एकूण 55 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियम कलम 65(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस हवालदार विजय बिर्जे,पोलिस नाईक एकनाथ सरमळकर, नितीन शेट्ये, पोलीस शिपाई खडपकर, सागर परबया महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालच्या पथकाने केली. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
konkansamwad 
