कळसुलकर प्राथमिक शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
सावंतवाडी
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) २०२६ मध्ये सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेचे तब्बल २१ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.जिल्हा गुणवत्ता यादीत कुमारी धारा महेंद्र कोरगावकर हिने १४ वा क्रमांक, कुमार वेद गोपाळ गवस याने २६ वा क्रमांक, कुमार चैतन्य प्रदीप सावंत याने २८ वा क्रमांक, तर कुमार कृष्णा उमेश पायशेठ याने ५० वा क्रमांक मिळविला.या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालक श्री. स्वार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद गोठोस्कर, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. भुरे सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत सर, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी, “कळसुलकर शाळा म्हणजे गुणवत्तेची खाण आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे,” असे गौरवोद्गार काढले. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. डी. जी. वरक आणि सौ. स्मिता घाडीगावकर यांचे मार्गदर्शन व परिश्रम महत्त्वपूर्ण ठरले. तसेच शिक्षक अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ आणि संजना आडेलकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.२१ विद्यार्थ्यांची पात्रता आणि चार विद्यार्थ्यांचे जिल्हा गुणवत्ता यादीतील यश यामुळे कळसुलकर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
konkansamwad 
