२२ मे पासून सावंतवाडीत रंगणार 'असंघटीत लोककलांचा महोत्सव'
सावंतवाडी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सावंतवाडीत एका भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव असणारा 'असंघटीत लोककलांचा महोत्सव' येत्या २२, २३ आणि २४ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहात हा सोहळा रंगणार असून, तीनही दिवस दररोज संध्याकाळी ठीक ६ वाजता कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. या महोत्सवासाठी सर्व रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.या तीन दिवसीय महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक आणि दुर्मिळ लोककलांचे सादरीकरण केले जाणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे शुक्रवार २२ मे ला संध्याकाळी ६ वाजता करपल्लवी गोंधळी, बहुरूपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंत आणि पारंपरिक फुगडी व झिम्मा या कलाप्रकारांनी महोत्सवाची सुरुवात होईल.दुसऱ्या दिवशी, शनिवार २३ मे ला संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांना आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लेंगी बंजारा नृत्य अशा वैविध्यपूर्ण आणि मनमोहक कलाप्रकारांचा आनंद घेता येईल. महोत्सवाच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी, रविवार २४ मे ला संध्याकाळी ६ वाजता दशावतार, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, भारुड आणि दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी असा ढोल-ताशांच्या गजरात बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. कोकण आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवण्याची ही सुवर्णसंधी सावंतवाडीकरांना मिळणार आहे.
konkansamwad 
