नटसम्राट प्रभाकर पार्सेकर यांचा मानाचा गौरव
परुळे
दशावतारी नाट्यकलेच्या रंगमंचावर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे नटसम्राट प्रभाकर शंकर पार्सेकर यांचा गौरव होणार आहे. सन २०२६ सालचा दशावतारी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘नटसम्राट कै. वसंत परुळेकर स्मृती पुरस्कार’ त्यांना जाहीर झाला असून, हा सन्मान म्हणजे त्यांच्या तपश्चर्येची, त्यागाची आणि दशावतारी कलेवरील निष्ठेची पावतीच आहे.
गौरव सोहळा ११ जानेवारीला
दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता, संस्कृती प्रतिष्ठान, परुळे यांच्या वतीने आयोजित कै. शामसुंदर श्रीपाद सामंत दशावतारी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात, परुळे येथील आदिनारायण मंदिराच्या भव्य रंगमंचावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या साक्षीने हा गौरव सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ५,५००/- रोख, शाल, श्रीफळ आणि मानपत्रक असे आहे.
प्रभाकर पार्सेकर यांचा अभिनय
प्रभाकर पार्सेकर यांनी आपल्या अभिनयातून रंगमंचाला जिवंत केले आहे. त्यांच्या प्रत्येक प्रवेशासोबत रंगमंचावर केवळ पात्र उभे राहत नव्हते, तर एक स्वतंत्र विश्व साकार व्हायचे. त्यांनी स्त्री अभिनयाच्या नाजूक, भावस्पर्शी भूमिका साकारताना रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणले; तर पुढे करारी, निर्दय खलनायक साकारताना रसिकांच्या काळजात भीतीचा ठाव घेतला.
अनेक कलाकार घडवले
एक कलाकार म्हणूनच नव्हे, तर एक गुरू म्हणूनही त्यांनी असंख्य कलाकार घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक कलाकार आज दशावतारी रंगभूमीवर आपली ओळख निर्माण करत आहेत. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दशावतारी कलेचा डंका वाजवत त्यांनी सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाला नवे आयाम दिले आहेत.
भावपूर्ण अभिनंदन
या गौरवाबद्दल संपूर्ण दशावतारी क्षेत्रातून, रसिकवर्गातून आणि कला प्रेमींमधून भावपूर्ण अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा गौरव म्हणजे दशावतारी कलेने आपल्या एका खऱ्या कऱ्या सम्राटाला केलेली मानाची सलामीच आहे.

konkansamwad 
