कासार्डेत अज्ञात वाहनाची म्हशींना धडक
कणकवली
मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशींच्या कळपाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तीन म्हशींनी घटनास्थळीच प्राण गमावले, तर उर्वरित दोन म्हशी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत जखमी म्हशींना मदत करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेमुळे कासार्डे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावर सातत्याने निर्माण होणारा भटक्या जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
konkansamwad 
