कुडणे खून प्रकरण....मुख्य फरार संशयित पोलिसांच्या ताब्यात
डिचोली
कुडणे-साखळी येथे झालेल्या शैला संजय घाडी (वय ५८) या महिलेच्या निघृण खून प्रकरणातील मुख्य फरार संशयित सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. मळईवाडी, शिरशिंगे, ता. सावंतवाडी) याला ठाणे येथून ताब्यात घेण्यात डिचोली पोलिसांना अवघ्या २४ तासांच्या आत यश आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली असून, संशयिताला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले आहे.चिकणे-कुडणे येथील रहिवासी शैला घाडी यांचा संशयित सागर राऊळ याने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला होता. खून केल्यानंतर संशयिताने घरातून सोन्याची साखळी आणि मृत महिलेचा मोबाईल चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी शुभम संजय घाडी यांनी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विराज धाऊसकर आणि आकाश परवार यांच्या पथकांनी तातडीने सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबई परिसरात धाव घेत कसून शोध सुरू केला. संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच युनिट ४ ची मोलाची मदत मिळाली.संशयित सागर राऊळ हा ठाणे परिसरात असल्याची पक्की माहिती मिळताच, डिचोली पोलीस, महाराष्ट्र क्राईम ब्रांच आणि स्थानिक खबऱ्यांनी संयुक्त सापळा रचला. ठाणे जिल्ह्यातील चेना ब्रिजजवळील 'द्वारका हॉटेल' परिसरातून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी काशीगाव पोलीस ठाण्यात त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. त्यानंतर मीरा-भाईंदर, ठाणे येथील न्यायालयात हजर करून त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डिचोली पोलिसांनी संशयिताला गोव्यात आणले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
konkansamwad 
