मदर तेरेसा स्कूल वेंगुर्लेचा पावसाळी क्रीडा महोत्सव!
वेंगुर्ला
मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2026 रोजी दोन दिवसीय पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धांना विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी स्पर्धांचे उद्घाटन शाळेच्या मैदानावर जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे आणि वेंगुर्ला येथील विद्युत सहाय्यक अभियंता गोपाळ तुमडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी, 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील गटांसाठी कबड्डी, खो-खो, लंगडी, रस्सीखेच, गोळाफेक यांसारख्या विविध सांघिक वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी इयत्ता दहावीचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक-शिक्षक संघ यांच्यात रंगलेल्या कबड्डी सामन्याने उपस्थितांची मने जिंकली, तर दुसऱ्या दिवशी महिला शिक्षिका, पालक प्रतिनिधी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी यांच्यात झालेला डॉजबॉल सामना स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला. दुसऱ्या दिवशी तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी सौ. सुजाता पडवळ आणि रयत शिक्षण संस्थेचे सदस्य एन्थोनी एलेक्स डिसोजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ अत्यावश्यक असल्याचे सांगून खेळातून संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात असे प्रतिपादन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो, व्यवस्थापक फा. फ्रान्सिस डिसोजा, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक समितीचे सदस्य तसेच पंच म्हणून हेमंत गावडे, गौरेश वायंगणकर, जितू म्हापसेकर आणि एन्थोनी लोबो उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले आणि शेवटी सहाय्यक शिक्षक सतीश वारंग यांनी सर्व मान्यवर, पालक, पंच आणि सहकार्यकर्त्यांचे आभार मानले.
konkansamwad 
