पेन्शनधारकांनी 'बेनिफिशियरी सत्यापन' ॲपद्वारे हयात दाखला सादर करणे बंधनकारक

पेन्शनधारकांनी 'बेनिफिशियरी सत्यापन' ॲपद्वारे हयात दाखला सादर करणे बंधनकारक

मालवण

 

       केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक विशेष सहाय्य विभागामार्फत विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी या योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी हयात दाखला सादर करणे बंधनकारक आहे. आता हा दाखला अधिक सुलभतेने सादर करता यावा, यासाठी शासनाने बीएसए ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून, याद्वारे आपले प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून समाजातील उपेक्षित आणि निराधार व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, लाभार्थ्यांना मोबाईल अॅपद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी बीएसए या मोबाईल अॅपच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वतः, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक, सेतू सुविधा केंद्र याद्वारे आपले हयात प्रमाणपत्र प्रमाणित करून घेऊ शकतात. ज्या लाभार्थ्यांनी चालू वर्षाचे हयात दाखले बँकेमार्फत ऑफलाईन पद्धतीने प्रमाणित करून संजय गांधी योजना, तहसीलदार कार्यालय मालवण येथे आधीच सादर केले आहेत, त्यांनाही आता बीएसएद्वारे ऑनलाईन प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील संबंधित सर्व लाभार्थ्यांनी कोणत्याही अडचणीशिवाय आपली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी तातडीने या अॅपद्वारे आपले प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.