सिंधुदुर्गातील शाळांमधील बेकायदेशीर वह्या-पुस्तके विक्रीची सखोल चौकशी होणार.....जिल्हा परिषद अध्यक्षांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वह्या, पुस्तके तसेच स्टेशनरीची बेकायदेशीर विक्री करून पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील स्टेशनरी स्टॉल धारकांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली होती याबाबत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी या विषयाकडे अध्यक्षांचे लक्ष वेधल्यानंतर हे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था आणि शाळांमध्ये नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे वह्या-पुस्तके विकली जात आहेत आणि त्यासाठी पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर तात्काळ पावले उचलत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातील अशा प्रकारच्या व्यावसायिकतेमुळे गोरगरीब विद्यार्थी आणि पालकांवर पडणारा हा आर्थिक भुर्दंड अत्यंत अन्यायकारक आणि निंदनीय आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया रुपेश पावसकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. आता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या या कडक भूमिकेमुळे बेकायदेशीरपणे साहित्य विकणाऱ्या शाळांचे धाबे दणाणले आहेत.
konkansamwad 
