बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

सावंतवाडी
 

   बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सोलापूर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. शंकर दत्तात्रय मस्के (वय ४३) व सचिन शिवाजी वाघमारे (वय २७, दोघेही रा. बोरामणी, सोलापूर) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून ६ लाख ८३ हजाराच्या दारूसह ६ लाखाची गाडी व २० हजाराचे रिकामी कॅरेट असा एकूण १३ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई  सावंतवाडी तालुक्यातील बांदा-ओटवणे रोडवर हॉटेल सुभेदार जवळ करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाहनांची तपासणी करत असताना बांदा- ओटवणे रोडवर संशयितांच्या गाडीची तपासणी केली असता त्यात भाजीच्या रिकाम्या कॅरेट मध्ये बेकायदा गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यानंतर मस्के व  वाघमारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६ लाखाच्या दारूसह ६ लाखाची गाडी व २० हजाराचे रिकामी कॅरेट असा एकूण १३ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत संबंधित लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
    ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, जवान रणजीत शिंदे, अभिषेक खत्री, सागर सुर्यवंशी, सतीश चौगुले आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर हे करत आहेत.