किल्ले सिंधुदुर्गलगत खडकांवर १७ फूट शार्कचा कुजलेला सांगाडा!......समुद्र खवळल्याने विल्हेवाटीची अडचण
मालवण
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग जवळील खडकाळ किनाऱ्यावर एक भलामोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आला आहे. हा शार्क सुमारे १५ ते १७ फूट लांबीचा असून, त्याची स्थिती अत्यंत कुजलेली आहे. विशेष म्हणजे माशाचा तोंडाचा भाग पूर्णपणे नाहीसा झाला असून उरलेल्या भागात हाडांचा सांगाडा आणि मांसाचे अवशेष दिसून येत आहेत.
किल्ल्यातील स्थानिक रहिवासी आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी हा सांगाडा सर्वप्रथम पाहिला. गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी भागात मुसळधार पावसासह वादळसदृश परिस्थिती असल्यामुळे समुद्र प्रचंड खवळलेला आहे. काल रात्री समुद्राला आलेल्या उधाणात हा शार्क मासा वाहून आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या समुद्राची परिस्थिती बिकट असल्याने संबंधित यंत्रणांना घटनास्थळी पोहोचून सांगाड्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे. समुद्र पुन्हा उधाणात आल्यास हा सांगाडा परत समुद्रात वाहून जाण्याची शक्यता असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.सततच्या मुसळधार पावसामुळे आणि खवळलेल्या लाटांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

konkansamwad 
