शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव.अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीची उपासना करण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवतांच्या तेजातून उत्पन्न झालेली आदिशक्ती दुर्गादेवी हिने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून विजय मिळविला.या विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्र साजरे केले जाते.
पहिला दिवस
पांढरा रंगशुद्धता व शांततेचे प्रतीक. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा होते. ती पर्वतराज हिमालयाची कन्या असून भक्ताला धैर्य व स्थैर्य प्रदान करते.
दुसरा दिवस
लाल रंगशक्ती, धैर्य आणि उर्जेचे प्रतिक. ब्रह्मचारिणी देवीची पूजा या दिवशी केली जाते. ती तपश्चर्येतून मिळणारी आध्यात्मिक शक्ती प्रकट करते.
तिसरा दिवस
निळा रंगधैर्य व करुणेचा संगम. या दिवशी चंद्रघंटा देवीची उपासना होते. तिच्या घंटानादाने असुरांचा नाश होतो व भक्ताला शांतता व सामर्थ्य प्राप्त होते.
चौथा दिवस
पिवळा रंग आशा व उमंग यांचा रंग. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. ती सूर्यतेजाचे स्वरूप असून सृष्टीची जननी मानली जाते.
पाचवा दिवस
हिरवा रंग समृद्धी आणि विकासाचे प्रतीक. या दिवशी स्कंदमाताची पूजा केली जाते. ती ज्ञान व संतती सुख प्रदान करणारी आहे.
सहावा दिवस
राखाडी रंगधैर्य, मनःशांती व संयमाचे प्रतिक. कात्यायनी देवी या दिवशी पूजली जाते. ती राक्षसांचा नाश करून भक्तांचे रक्षण करणारी दैवी रूप आहे.
सातवा दिवस
केसरी रंगवीरत्व, तेज व कर्तृत्व दर्शवणारा रंग. या दिवशी कालरात्री देवीची पूजा होते. तिचा भयंकर अवतार भय व अज्ञान नष्ट करणारा आहे.
आठवा दिवस
मोरपंखी रंगसंपन्नता आणि कलात्मकतेचा रंग. या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. ती शुद्ध स्वरूप असून भक्ताला मोक्ष आणि सौभाग्य प्रदान करते.
नववा दिवस
गुलाबी रंगप्रेम, श्रद्धा व सौंदर्याचे प्रतीक. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. ती सर्व सिद्धी व ज्ञान देणारी दैवी शक्ती आहे.
आजच्या युगात नवरात्र हा केवळ धार्मिक सण नाही, तर स्त्रीशक्तीचा गौरव आहे.नवरात्र आपल्याला सांगते की प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचे स्वरूप आहे.समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ स्त्रीशक्तीकडे आहे.शिक्षण, कला, विज्ञान, उद्योग असे सर्व क्षेत्र आज महिलांच्या सामर्थ्याने समृद्ध होत आहेत.नवरात्रीतील नऊ दिवस स्त्रीच्या नऊ रूपांचे चिंतन करून आपण तिच्या सामर्थ्याचे पूजन करतो.म्हणूनच नवरात्र आजच्या काळात फक्त मातीच्या मूर्तींपर्यंत मर्यादित न ठेवता स्त्रीला समता, सन्मान आणि संधी देण्याचा संदेश देते.