ऑइल इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; राजस्थानच्या वाळवंटातून तेलाचा 'विक्रमी' ओघ!

ऑइल इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; राजस्थानच्या वाळवंटातून तेलाचा 'विक्रमी' ओघ!

 

बीकानेर-नागौर

 

    जागतिक स्तरावर युद्धाच्या सावटाखाली ऊर्जा संकट गडद होत असताना, भारताच्या ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या थार वाळवंटात अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली आहे. बीकानेर-नागौर भागातील बागेवाला फील्ड येथे कच्च्या तेलाच्या उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांची वाढ झाली असून, भारताची परकीय तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. बागेवाला फील्डमधील उत्पादनाचे आकडे थक्क करणारे आहेत.गेल्या वर्षी दररोज ७०५ बॅरल होणारे उत्पादन आता १,२०२ बॅरल पर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४३,७७३ मेट्रिक टन कच्च्या तेलाचे उत्पादन झाले, जे मागील वर्षी ३२,७८७ मेट्रिक टन होते. या क्षेत्रात एकूण ५२ तेल विहिरी असून त्यापैकी ३३ सध्या सक्रिय आहेत. थारच्या वाळवंटातील भू-वैज्ञानिक स्थिती अत्यंत कठीण आहे. येथील तेल अतिशय घट्ट आणि चिकट असल्याने ते बाहेर काढणे पारंपरिक पद्धतीने अशक्य होते. मात्र, ऑइल इंडियाने तंत्रज्ञानाच्या जोरावर ते शक्य करून दाखवले. २०१८ मध्ये चाचणी झालेले हे थर्मल तंत्रज्ञान आता उत्पादनाचा कणा बनले आहे. हेवी ऑइल सेक्टरमध्ये पहिल्यांदाच या प्रगत तंत्राचा वापर करण्यात आला. याशिवाय इलेक्ट्रिक डाऊनहोल हीटर्स आणि हाय टेम्प्रेचर थर्मल वेलहेड्समुळे ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. काढलेले कच्चे तेल टँकर्सद्वारे गुजरातच्या मेहसाणा (ONGC) प्लांटमध्ये नेले जाते.तिथून पाईपलाईनद्वारे ते आयओसीएल (IOCL) कोयली रिफायनरी येथे शुद्धीकरणासाठी पाठवले जाते जिथे त्याचे वापरण्यायोग्य इंधनात रूपांतर होते.थोडक्यात मध्य पूर्वेतील तणाव आणि इराण-इस्रायल वादामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना, भारताने स्वबळावर तेल उत्पादनात मारलेली ही झेप देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.