वन विभागातील मत्स्य तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करा.....मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी
मुंबई
राज्यातील वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. राज्यातील बिगर संरक्षित वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये शासन मान्यता प्राप्त मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत आज मंत्रालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीमुळे शासनाचा मोठा महसुली तोटा होत असल्याकडे लक्ष वेधले. जलाशयांमध्ये लहान व मोठ्या माशांचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक असल्याचे सांगत, अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी हे तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मागणीची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाच्या अखत्यारीतील तलावांमध्ये होणारी अनधिकृत मासेमारी तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून आणि गस्तीची संख्या वाढवून कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी विभागाला दिले.
बैठकीदरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयारण्य व राखीव वनक्षेत्रात कायदेशीररित्या मासेमारीस परवानगी देता येत नसल्याची माहिती दिली. यावर मंत्री गणेश नाईक यांनी कायद्याच्या चौकटीत राहून, तसेच सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करून काही जलाशयांमध्ये अटी व शर्तीसह परवानगी देता येईल का, याचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश दिले. या अभ्यासानंतर पुन्हा एकदा आढावा बैठक बोलावली जाणार आहे. या बैठकीस वने विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक म्हैसकर यांच्यासह दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

konkansamwad 
