सिंधुदुर्ग आरटीओची खाजगी बसवर धडक कारवाई

सिंधुदुर्ग आरटीओची खाजगी बसवर धडक कारवाई

 

कुडाळ

 

    सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील इन्सुली व ओसरगाव या दोन चेक नाक्यांवर 91 खासगी बसची तपासणी केली. यात 20 गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आरटीओच्या या धडक कारवाईमुळे खासगी बस चालक - मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या बसेसमधून मोटारसायकल, खाजगी सामान, यासह सध्या हंगाम सुरू असल्यामुळे आंब्याच्या पेट्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने इन्सुली चेक पोस्ट व ओसरगाव चेक नाक्यावर धडक कारवाई करत खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 91 बसेस तपासण्यात आल्या. यापैकी 20 गाड्यां मध्ये आंब्याच्या पेट्या व इतर खाजगी साहित्य आढळून आल्याने कारवाई करत 2 लाख 10 हजार रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई यापुढे ही अशीच सुरू राहणार असल्याचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले.