वाढत्या चोरीच्या घटनांमुळे बांदा पोलिसांची शहरात अचानक नाकाबंदी

सावंतवाडी
वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज बांदा पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांदा शहरातही अलीकडच्या काळात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सराफ व्यावसायिकांच्या झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी शहरात गस्त वाढवण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. बांदा हे एक महत्त्वाचे शहर असून येथे परप्रांतीय व्यापारी तसेच अनोळखी व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली जात होती. निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्यासह वाहतूक पोलीस शेखर मुणगेकर आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी बांदेश्वर मंदिर रस्त्यावर अचानक नाकाबंदी केली. यावेळी प्रामुख्याने गोव्यातून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या अचानक केलेल्या कारवाईमुळे चोरट्यांवर वचक बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.