माजगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन युवक जखमी
सावंतवाडी
भरधाव कारने धडक दिल्याने सावंतवाडीतील दोन युवक जखमी झाले आहेत. संतोष नारायण सावंत (रा. कोलगाव) व जोसेफ डिसोजा (रा. जुना बाजार) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना काल रात्री जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर माजगाव येथे घडली.
संतोष सावंत आणि जोसेफ डिसोजा हे दोघेही मोपा विमानतळावर कामाला आहेत. काल रात्री उशिरा ते आपल्या मोटरसायकलने सावंतवाडीच्या दिशेने येत असताना माजगाव येथे मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात संतोष सावंत यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जोसेफ डिसोजा यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलीस अधिकारी मनोज राऊत व श्री. लोकरे या अपघाताचा अधिक तपास करत असून धडक देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे.

konkansamwad 
