हिंदी दिवसानिमित्त वेंगुर्ले येथील निबंध स्पर्धेत ४३ युवक - युवतींचा सहभाग

हिंदी दिवसानिमित्त वेंगुर्ले येथील निबंध स्पर्धेत ४३ युवक - युवतींचा सहभाग

 

वेंगुर्ले

 

     14 सप्टेंबर या हिंदी दिवसाचे औचित्य साधून "मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग" व "वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तुळस” यांच्या संयुक्त विद्यमानाकडून  युवक-युवतींसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा वेंगुर्ले येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 14 ते 29 वयोगटातील तब्बल 43 युवक-युवतींनी सहभाग घेऊन हिंदीप्रेम व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये सावंतवाडी लॉ कॉलेज चा हरेश वरावडेकर प्रथम तर खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला ची निकिता कबरे ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. या स्पर्धेसाठी आयोजकांनी वैश्विक परिदृश्य में हिंदी भाषा का महत्व, डिजिटल युग और हिंदी का भविष्य, हिंदी और भारतीय युवा पीढ़ी, रोजगार और व्यावसायिक क्षेत्र में हिंदी की भूमिका, सोशल मीडिया के युग में हिंदी भाषा की स्थिती असे विषय दिले होते. या विषयांतून सहभागी स्पर्धकांना जागतिक स्तरावर हिंदीचे महत्त्व, डिजिटल क्रांतीत हिंदीचे स्थान, युवकांमधील हिंदीची ओळख, रोजगार व व्यवसाय क्षेत्रातील उपयुक्तता तसेच सोशल मीडियातील हिंदीची सद्यस्थिती या विविध अंगांचा सखोल विचार मांडण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या माध्यमातून युवक-युवतींच्या लेखनकौशल्याला वाव मिळून हिंदीच्या प्रसार-प्रचारालाही चालना मिळाली.

 

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणेः

प्रथम क्रमांकः हरेश महादेव वरावडेकर. द्वितीय क्रमांकः निकिता नारायण कबरे. तृतीय क्रमांकः मयुरी वासुदेव तांडेल. उत्तेजनार्थ प्रथमः चैताली मिलिंद निकम. उत्तेजनार्थ द्वितीयः विधी भिवा नाईक उत्तेजनार्थ तृतीयः सानिया गजानन वराडकर.

           विजेत्यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात युवक-युवतींनी हिंदी भाषेला अधिक प्रमाणात आत्मसात करण्याची आणि रोजगार तसेच जागतिक पातळीवर त्याचा उपयोग वाढवण्याची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमाचे स्वागत, प्रस्ताविक व सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परुळकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तुळस यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाद्वारे युवक-युवतींमध्ये हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.