हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सावंतवाडीतील पीर उत्सवाला सुरुवात

सावंतवाडी
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सावंतवाडीतील पीर उत्सवाला आज सुरुवात करण्यात आली. मोहरमनिमित्त शहरात सात ठिकाणी ताजिया बसवण्यात आल्या. शहरात सरदार निंबाळकर पीर, जलाल शहा पीर, तहसीलदार पीर, सय्यद पीर, म्हाताचे पीर, पटवीचे पीर, काझीचे पीर असे सात ठीकाणी पीर बसविण्यात आले आहेत. हिंदू बांधवांना या ठिकाणी विशेष मान असतो. सावंतवाडी राजघराण्याला येथे नैवेद्याचा मान आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा हा उत्सव सावंतवाडीत साजरा केला जातो. हिंदू- मुस्लिम ऐक्याच प्रतीक अशी सरदार निंबाळकर पिराची ओळख आहे. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेला हा पीर आजही सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. 'मराठ्यांचा पीर' अशीही याची ओळख आहे. सालईवाडा भागात असलेला सरदार निंबाळकर पीर गेली अनेक वर्षे मुस्लिम बांधवांसह हिंदू धर्मीयांकडूनही पूजला जातो. येथे गूळ, धूप, अगरबत्तीचा नैवेद्य दाखविला जातो. हा पीर विसर्जनाला जात असताना कळसुलकर हायस्कूल येथील भवानी देवीच्या भेटीला जातो. पूर्वी भवानी मंदिरात पीराच्या पतवा ठेवल्या जात असत. त्यामुळे त्याठिकाणी भवानी देवीला भेटण्याची प्रथा आहे. त्याकाळी पीर म्हणून पूजले जाणारे पंजे हे विहिरीत सापडले होते. एकतेचा हा वारसा आजही सावंतवाडी शहरात जपला जातो आहे.