सतत कोसळणाऱ्या पावसामुळे देवगड तालुक्यातील मुख्य धबधबे प्रवाहित

देवगड
अवकाळी पावसाने देवगड तालुक्यात धुव्वाधार बरसात सुरूच ठेवली आहे. एकीकडे हंगामाच्या अंतिम टप्प्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने समुद्रातील मासेमारी व पर्यटन व्यवसायाला ब्रेक लागला. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे देवगड तालुक्यातील मुख्य धबधबे प्रवाहित झाल्याने वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली आहे, तर खोल समुद्रातील मच्छीमारीला ब्रेक लागल्याने व्यवसायिक पारंपरिक मच्छीमारीकडे वळू लागले आहेत.यावर्षी पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात बहरला. मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. यामुळे देवगडमधील सर्व पर्यटनस्थळे गजबजली होती. मात्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला असून पर्यटक माघारी परतू लागले आहेत. पर्यटन व्यावसायिकांच्या व्यवसायाला खीळ बसल्याने त्यांचे नुकसान झाले.दरम्यान धुव्वाधार पावसामुळे देवगड तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू तळवडे येथील न्हावनकोंड धबधबा व मणचे येथील व्याघ्घेश्वर धबधबे प्रवाहित झाले आहेत. यामुळे वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली असून पर्यटकांची धबधब्यावर गर्दी वाढू लागली आहे. खोल समुद्रातील मासेमारी जवळपास बंद झाल्याने मच्छिमार आता पारंपारिक मच्छिमारीकडे वळले आहेत. समुद्रकिनारी व खाडीकिनारी पागाने मच्छिमारी करण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे.