आषाढी एकादशी विशेष लेख...
कोकणच्या निसर्गरम्य कुशीत, समुद्राच्या लाटांशी संवाद साधणाऱ्या वाळूत आणि हिरव्यागार डोंगररांगा पोटात साठवून ठेवलेल्या गावांमध्ये एक अनोखी आणि भक्तीची परंपरा जपली जाते-ती म्हणजे कोकणातील पंढरीची वारी. वारीमध्ये केवळ चालणे नाही, ती आहे अंत:करणातील भावनांची यात्रा. कोकणातील गावागावातून, वाड्यावाड्यांतून वारीचे टाळ-मृदंग वाजू लागले की, प्रत्येक घरात उत्साह संचारतो. पावसाच्या सरीमध्ये ओलेचिंब झालेले पण तरीही विठ्ठलाच्या नामस्मरणात हरवलेले वारकरी, हे कोकणाच्या मातीचे वैभव आहे.
कोकणच्या मातीला लागली भक्तीची सवारी |
निसर्गाच्या कुशीत वाजते टाळांची झणझणारी !...
पावसाच्या सरीत न्हालेली हिरवीगार वाडी |
विठोबाच्या ओढीने निघते भक्तांची वारी !...
वारीच्या दिवशी पहाटेच गावातील मंदिरात फड जमून, टाळ, मृदंग आणि अभंगाच्या सुरांनी आसमंत भारावून जातो. ''पुंडलिक वरदा हरीविठ्ठला"चा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या पालखीला सजवतात. प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात एक वेगळा तेज असतो-तो म्हणजे भक्तीचा, एकात्मतेचा आणि विठ्ठल प्रेमाचा
गावागावातून येती, हातात झेंडे भगवे |
मनात एकच आस, विठोबा भेटावा जीवावेगळे !...
पावलोपावली भक्ती, ओठांवर नामस्मरण |
कोकणच्या पंढरीला लाभले भक्तांचे चरण! !...
टाळ - मृदुंगाच्या गजरात नाचते श्रद्धेचीछाया |
मंदिराच्या प्रांगणात फुलते भक्तीची माया !...
एकरुप होऊन सारे, विसरती भेदभाव |
कोकणातील वारीत उमटे विठ्ठलप्रेमाचा ठाव !...
वारीमध्ये वय, जात, धर्म, श्रीमंती-कंगाली यांचे भेद विसरले जाऊन, सगळे एकत्र येतात- ''माळकरी", ''फडाप्रमुख", ''भजनकार", ''पाथरवट", ''शेतकरी" सगळ्यांची ओळख एकच, ते म्हणजे ''विठ्ठलाचा वारकरी"! येथील लोक वाटेत त्यांच्यासाठी पाण्याची,फराळाची सोय करतात. पंढरीची वारी म्हणजे माणुसकीचा, प्रेमाचा आणि सहकार्याचा जिवंत उत्सव आहे. वारी मंदिरात पोहोचते. टाळ-मृदुंगाचा गजर, ''ज्ञानेश्वर माऊली तुकाराम" च्या जयघोषित विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सगळे वारकरी नतमस्तक होऊन, डोळ्यांतून आनंदअश्रू वाहतात. एक वारी संपते, पण मनात नवी उमेद, नवा उत्साह आणि नवा अध्यात्मिक प्रकाश घेऊन प्रत्येक वारकरी परततो.
सागराच्या लाटांवर गाजते अभंगांची गाणी |
माडाच्या सावलीत विसावते भक्तांची मनी!...
फुलांच्या गंधात मिसळते तुळशीची वारी |
विठ्ठलनामाच्या गजरात रंगते पंढरीची सवारी !...
येथील ''पंढरीची वारी" ही पारंपारिक वारी प्रमाणेच विविध कोकणातील गावांमध्ये, विशेषतः स्थानिक विठ्ठल किंवा विठोबा मंदिरामध्ये साजरी केली जाते. काही ठिकाणी स्थानिक वारकरी मंडळी एकत्र येऊन पायी यात्रा काढतात, तर काही ठिकाणी मंदिर परिसरातच उत्सव साजरा होतो. कोकणातील पंढरीची वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे कोकणच्या मातीतील भक्ती, निसर्ग आणि माणुसकी यांच्या सुंदर संगम. अशा या वारीची अनुभूती प्रत्येकाने एकदा तरी घ्यावी, कारण ही वारी मनाला आणि जीवनाला एक नवी दिशा देते.
ही वारी आहे निसर्ग, भक्ती आणि प्रेमाची |
कोकणच्या पंढरीला वंदन माझ्या मनाची !
विठोबाच्या पायाशी वाहू दे ही चरण स्पर्श कविता |
वारीच्या ओढीने भरू दे जीवनगाथा!

konkansamwad 
