इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रा. मधू दंडवते ग्रंथालयास सदिच्छा भेट

इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रा. मधू दंडवते ग्रंथालयास सदिच्छा भेट

 

फोंडाघाट

 

        कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त फोंडाघाट येथील प्राध्यापक मधू दंडवते ग्रंथालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपस्थित राहून दिवंगत प्रा. दंडवते यांच्या शिक्षण-साहित्यसेवेची माहिती जाणून घेतली तसेच ग्रंथालयातील विविध विभाग व पुस्तकसंग्रहाचा अभ्यास केला.
       या विशेष भेटीच्या प्रसंगी ग्रंथपाल सौ. नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालयाचा इतिहास, उपलब्ध ज्ञानस्रोत, डिजिटल वाचन सुविधा तसेच वाचनसंस्कृतीच्या जपणुकीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित ग्रंथालय वापराचे फायदे आणि अध्ययनातील संसाधनांचा योग्य उपयोग कसा करावा याबद्दलही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमास इंग्रजी विभागाचे प्राध्यापक प्रा. संतोष आखाडे आणि प्रा. विनोदसिंह पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये संभाजी पाचंगे, दुर्वांकुश मेस्त्री यांसह इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
  या भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, ग्रंथालयाबद्दल आदरभाव आणि ज्ञानसंपादनाची उत्सुकता वाढीस लागल्याचे प्राध्यापकांनी प्रतिपादन केले. शैक्षणिक वातावरणात ग्रंथालयाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा अनुभव विद्यार्थ्यांना या सदिच्छा भेटीतून मिळाला. इंग्रजी विभागाच्या या उपक्रमाचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी कौतुक केले.