उद्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी होणार मतदान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ हजार ५५१ मतदार; ३४ मतदान केंद्र.
सिंधुदुर्ग.
कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक मंगळवार दिनांक २६ जून रोजी होत असून या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे व महाविकास आघाडीकडून रमेश किर या दोन उमेदवारांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ मतदान केंद्रावर १८,५५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ ठेवण्यात आली असून निवडणुकीकरिता १८२ निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. ही मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे दिली आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी, खरी लढत विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्यातच लढत होणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही उमेदवारांकडून प्रचार यंत्रणा जोरदार राबविली जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हधातील पदवीधर मतदार मतदान करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८,५५१ मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीच्या निवडणूकीत ५ हजार मतदार होते. मात्र यावेळी मतदारांच्या संख्येत बाढ झाल्याने मतदान केंद्रेही बाढविण्यात आली असून एकूण ३४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच ही निवडणूक पारपाडण्यासाठी १८२ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदाराना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.