दोडामार्ग थोरलेभरड ग्रामस्थांचा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा.

दोडामार्ग थोरलेभरड ग्रामस्थांचा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा.

दोडामार्ग.

  गेल्या अनेक वर्षांपासून वहिवाट असलेली पायवाट पाणद रस्ता काही मंडळीनी ग्रामपंचायतमधील काही जबाबदार मंडळींना हाताशी धरून दोन वर्षांपूर्वी पासून थोरलेभरड येथील ग्रामस्थाचा मार्ग बंद केला.या नंतर आंदोलन उपोषण करून देखील हा तिढा सुटलेला नाही.गेल्या वर्षी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन एका खाजगी जागेतून रस्ता तात्पुरता दिला, पण येथून मोठे चार चाकी वाहन जावू शकत नाही. तो आता जमीन मालक बंद करायला निघाला आहे. त्यामुळे मार्ग बंद होणार आहे.ग्रामपंचायत मालकीची रस्ता पायवाट खुली केली जात नाही, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा थोरलेभरड येथील ग्रामस्थांनी दिला आहे. येथील ग्रामस्थ गेल्या तीन वर्षांपासून रस्ता पायवाट खुली करावी यासाठी भांडत आहेत.तत्कालीन सरपंचांच्या एकतर्फी भूमिकेमुळे हा रस्ता अडवून बंद केला. ग्रामपंचायतने आवश्यक ती दखल घेऊन कारवाई केली असती तर ही समस्या निर्माण झाली नसती.ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी इतर कर वसुली करते, पण त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता पायवाट देवू शकत नाही. हे साटेली भेडशी ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी यांचे अपयश आहे. थोरलेभरड येथील रस्ता पायवाट यांची ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे. खर्च पडलेला आहे, असे असताना केलेले अतिक्रमण बाजूला करून वाट मोकळी करणे ग्रामपंचायतची जबाबदारी होती, पण ती पार पाडली नाही. आता नवीन सरपंच, उपसरपंच, सदस्य यावर तोडगा काढतील ती आशा नाही.साटेली भेडशी थोरलेभरड येथील ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन घेराव देखील घातला तेव्हा केवळ आश्वासन दिले, पण काही कारवाई झाली नाही. साटेली भेडशी थोरलेभरड येथील ग्रामस्थ सद्या ये जा करतात. ती जमीन खाजगी आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात लोकांना तात्पुरती वाट म्हणून एका खाजगी जमीनीतून वाट दिली ही वाट काढताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना जमीन धारकांकडून आरोप देखील केले होते. तरी प्रशासकीय अधिकारी पोलीस यांनी वाट करून दिली होती. पण वाट आता पुन्हा बंद केली जाणार आहे.त्यामुळे थोरलेभरड येथील ग्रामस्थांचा मार्ग बंद होऊन शालेय विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. साटेली-भेडशी थोरलेभरड येथील रस्ता पायवाट खुली करण्यासाठी ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवून देखील ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाही. सर्व यंत्रणा अपयशी ठरली आहे. तेव्हा येत्या लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा थोरलेभरड येथील ग्रामस्थांनी दिला आहे.