सावंतवाडी बांदा येथील श्री बांदेश्वर वर्धापनदिन उत्साहात साजरा

सावंतवाडी
सावंतवाडी बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त हजारो भाविकांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले. "हर हर हर हर सांब सदाशिव" च्या गजराने सर्व वातावरण शिवमय झाले. या सोहळ्या निमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री गणपती पूजन, देवतांस नारळ, विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे झाले. त्यानंतर सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान आदी विविध धार्मिक विधी ब्राह्मण वृंदाकरवी करण्यात आले. दुपारी महाआरती होऊन महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाळी स्थानिक मंडळाची भजने त्यानंतर युवा कीर्तनकार विनीत महाराज म्हात्रे डोंबिवली यांचे कीर्तन तर रात्री श्रींचा पालखी सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.