जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर.
मुंबई.
अभिनेते अशोक सराफ यांना अत्यंत प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.सिनेमा असो, नाटक किंवा छोट्या पडद्यावरची मालिका.भूमिका तुफान विनोदी असो, नर्म विनोदी असो किंवा धीरगंभीर.ज्यांनी आपल्या परिसस्पर्शानं शेकडो भूमिकांचं सोनं केलं, मराठी रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि मराठी सिने-नाट्यसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले, असे अभिनयातील वजीर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अत्यंत प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे."ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले" अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.