दोडामार्गचा राहुल सावंत अखिल भारतीय पोलीस घोडेस्वारी स्पर्धेत प्रथम 

दोडामार्गचा राहुल सावंत अखिल भारतीय पोलीस घोडेस्वारी स्पर्धेत प्रथम 

दोडामार्ग 

            देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'अखिल भारतीय पोलीस घोडेस्वारी स्पर्धा २०२६' मध्ये दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावचे सुपुत्र राहुल अजय सावंत यांनी सुवर्णमय कामगिरी केली आहे. टेंट पिगिंग या वैयक्तिक प्रकारात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांचे पोलीस दल आणि पॅरामिलिटरी दलांमधील एकूण २५ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या टेंट पिगिंग प्रकारात देशभरातून १०१ अनुभवी स्पर्धक रिंगणात उतरले होते. टेंट पिगिंग हा घोडेस्वारीतील एक अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक खेळ मानला जातो, ज्यामध्ये वेगाने धावणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन जमिनीवरील लक्ष्यावर अचूक निशाणा साधावा लागतो. राहुल सावंत यांनी आपल्या जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर, वेग आणि अचूकतेचा मेळ घालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना मानाची 'बीएसएफ चॅलेंज ट्रॉफी' देऊन गौरविण्यात आले. राहुल सावंत यांचे हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीचे फलित आहे. ग्रामीण भागातून येऊन देशपातळीवरील पोलीस दलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणे ही संपूर्ण दोडामार्ग तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.