सावंतवाडीत ४ जुलैपासून जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६
सावंतवाडी
नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर सर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित्त 'जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. 4 जुलै ते 7 जुलै 2026 या कालावधीत सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या इनडोअर स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला यांचा समावेश आहे. बॅडमिंटन स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 वी विद्यार्थी-विद्यार्थिनी व खुला गट यांच्यासाठी होईल. टेबल टेनिस 14 वर्षांखालील व 19 वर्षांखालील गटात, कॅरम 14 व 18 वर्षांखालील तसेच खुला गट सिंगल व डबलमध्ये, बुद्धिबळ 11 व 16 वर्षांखालील व खुला गटात होणार आहे. चित्रकला स्पर्धा इ. 1 ली ते 5 वी - विषय 'स्वच्छ सुंदर सावंतवाडी', इ. 6 वी ते 10 वी - 'पर्यटनाची पंढरी, मोती तलाव आणि सावंतवाडीचे वैभव', इ. 11 वी ते 12 वी व FY, SY, TY - 'प्रजाहितदक्ष राजा - श्रीमंत बापूसाहेब महाराज' या विषयांवर होईल. शालेय विद्यार्थ्यांसाठी फी माफ असून खुल्या गटाकरिता सिंगलसाठी 100 रुपये व डबलसाठी 200 रुपये प्रवेश शुल्क आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारात व प्रत्येक गटात किमान 8 स्पर्धक आवश्यक आहेत. प्रत्येक खेळाडूस एकाच क्रीडा प्रकारात व एकाच गटात खेळण्यास परवानगी आहे. स्पर्धेसाठी शाळेतील व खुल्या गटातील विद्यार्थ्यांची नावे 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत नगरपरिषद कार्यालयातील संबंधित क्रीडा प्रकारातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे नोंदवावीत. स्पर्धेचे उद्घाटन 4 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता बॅडमिंटन हॉल, जिमखाना येथे होईल. बक्षीस वितरण समारंभ 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता याच ठिकाणी संपन्न होईल, अशी माहिती सभापती श्री. सुधीर सुरेश आडिवरेकर व नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे सावंत भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
konkansamwad 
