महाकुंभ वर पी.एम. मोदींनी पोस्ट केला ब्लॉग

दिल्ली
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराज महाकुंभाच्या पर्वाची सांगता झाली. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटल आहे की, महाकुंभ संपला आहे. एकतेचा महान यज्ञ पूर्ण झाला आहे. प्रयागराजमधील एकतेच्या महाकुंभात संपूर्ण ४५ दिवस चाललेल्या एकाच उत्सवासाठी १४० कोटी देशवासीयांची श्रद्धा एकाच वेळी एकत्र आली. महाकुंभाच्या समाप्तीनंतर माझ्या मनात आलेले विचार मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लॉगमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिल आहे की, "२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा समारंभात मी देवाच्या भक्तीद्वारे देशभक्तीबद्दल बोललो होतो. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्या दरम्यान सर्व देवी-देवता एकत्र जमल्या, संत आणि महात्मे जमले, मुले आणि वृद्ध लोक जमले, महिला आणि तरुण एकत्र आले. आम्ही राष्ट्राची जागृत जाणीव पाहिली. हा महाकुंभ एकतेचा महाकुंभ होता, जिथे या एकाच उत्सवाद्वारे १४० कोटी देशवासीयांची श्रद्धा एकाच वेळी एकत्र आली. जेव्हा एखाद्या राष्ट्राची जाणीव जागृत होते, जेव्हा ते शतकानुशतके गुलामगिरीच्या मानसिकतेच्या सर्व बेड्या तोडून नवीन चेतनेने हवेत श्वास घेऊ लागते. महाकुंभात आपल्याला हे दृश्य दिसल."