राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज.
पुणे.
मॉन्सूनच्या परतीचे वेध लागले असताना राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. दरम्यान आजदेखील, विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण विभागांमध्ये महाराष्ट्रात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी सातारा, सांगली, अहमदनगर तर २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २३ ते २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात तर २३ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर २४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबईसह उपनगरात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पाऊस पुनरागमन करेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.