शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पालघर.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पालघर येथील वाढवण बंदराचे भूमीपूजन पार पडले. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं.
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत माफी मागितली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, भाषणाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या मनातील भावना व्यक्त करतो. भाजपने ज्यावेळी मला सर्वप्रथम पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं, त्यावेळी मी सर्वात आधी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मी राष्ट्रसेवेच्या नव्या यात्रेची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आणि माझ्या सर्व साथीदारांसाठी केवळ नाव नाही. आम्हा सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मी आज माझ्या आराध्य दैवताची त्यांच्या पायावर डोकं ठेवत माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
   विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला देखील नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही ते नाहीत जे रोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असतात. देशभक्तांच्या भावनांचा अपमान करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपशब्द वापरुनही माफी ते मागत नाही.असं करुनही ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे संस्कार दिसत आहेत, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. आमचे संस्कार वेगळे आहेत, म्हणून महाराष्ट्रात येता क्षणी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागत आहे. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात, त्यांना ज्या वेदना झाल्या आहेत, त्यांची देखील मी माफी मागतो. आमच्या आराध्य दैवतापेक्षा मोठं कुणी नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.