छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ११ मे रोजी होणार अनावरण

सिंधुदुर्ग
मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ मे रोजी सकाळी 12:30 ते 1:30 दरम्यान होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री कणकवली तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन देखील करणार आहेत. उभारण्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे.राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश निर्गमित केलेले आहेत. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे. तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे.