कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता.

मुंबई.

   राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे.राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात आज रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
   हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
   गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसाचा फटका सांगीलसह कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
    सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी ही 40 फुटांवर गेली आहे.  ही इशारा पातळी आहे. पावसाचा जोर वाढला तर या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. अन्यथा 40 फुटाच्या आसपास पाणी पातळी स्थिर होण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली.अनेक ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर आणि कोयना येथे १७० मिलीमीटर पाऊस झाला.विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.