कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद; चार जवान गंभीर जखमी.
श्रीनगर.
पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक झाली आहे. यामध्ये एका मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह ४ भारतीय जवान जखमी झाले आहेत. तर एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीमच्या मदतीने नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्कराच्या चौकीला लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, हल्ल्यात एक पाकिस्तानी नागरिक ठार झाला आहे, तर आमचे दोन सैनिक जखमी झाले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीमचा हल्ला हाणून पाडला. हल्ल्यात सामील असलेल्या BAT टीममध्ये दहशतवादी संघटनांशी जवळून काम करणारे एसएसजी कमांडो आणि पाकिस्तानी लष्कराचे सैनिक यांचा समावेश असल्याचा संशय आहे.