पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे,आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे,आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नवीदिल्ली.

   भारतात यापूर्वी सरकार म्हणजे मायबाप अशी संकल्पना होती, नागरिकांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे हात पसरावे लागायचे. एखाद्या गोष्टीसाठी विनंती किंवा शिफारस करावी लागत असे. मात्र, आमच्या सरकारने प्रशासनाचे हे मॉडेल बदलले. आज प्रशासन वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधा स्वत: नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, नागरिकांना सरकारकडे यावे लागत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले.
   यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या काळातील सरकारी योजनांचा आणि सुधारणांचा पाढा वाचला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच्या काळातील काँग्रेसशासित राजवटीच्या काळातील त्रुटींचा उल्लेख केला. अनेक दशकं भारत देश 'होता है, चलता है', अशा वृत्तीने चालत होता. नवीन काही करायला गेलं तर वाद होतील, अशी भीती अनेकांना वाटत होती. जितक्या गोष्टी आहेत, त्यामध्ये संतुष्ट राहा, अशी वृत्ती समाजात होती. देशात काही होणार नाही, परिस्थिती कधीच बदलणार नाही, अशी लोकांची मानसिकता होती.
   आमच्या सरकारने ही मानसिकता तोडण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. यापूर्वी पुढच्या पिढीसाठी आम्ही आतापासून काम का करायचे, अशा वृत्तीने राज्यकर्ते वागत होते. त्यावेळी तरुणांच्या अपेक्षांचा विचार झाला नाही. त्यामुळे तरुण हे संधी आणि सुधारणांच्या प्रतीक्षेत होते. आमच्या हातात सरकारची जबाबदारी आल्यावर आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. शहरी, मध्यमवर्ग, वंचित आणि तरुणांसाठी आमच्या सरकारने अनेक सुधारण केल्या. आम्ही या सुधारणा केवळ वाहवा मिळवण्यासाठी  किंवा राजकीय नाईलाजापोटी करत नाही तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले.
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विकासाच्या मॉडेलचा उल्लेख केला. आमच्या सुधारणांचा मार्ग हा विकासाचा राजमार्ग आहे. या सुधारणा फक्त उच्चशिक्षीत किंवा बुद्धिवादी वर्गासाठी सीमित नाहीत. आम्ही राजकीय समीकरणांचा विचार करुन कोणत्याही सुधारणा राबवत नाही अथवा धोरणे ठरवत नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हीच प्राथमिकता आहे. आमचा भारत महान व्हावा, हाच संकल्प मनात ठेवून आम्ही प्रत्येक पाऊल उचलतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.