चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात. भारताच्या भाळी लागणार ऐतिहासिक यशाचा टिळा.
दिल्ली.
आज संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची वेळ, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान- ३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान- ३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. या क्षणाला चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून लँडिंगची तयारी सुरू झालीय. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान- ३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं अशी माहिती इस्रोनं दिलीय.