मदर तेरेसा स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
वेंगुर्ला.
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या सहा. शिक्षिका निधी तांडेल यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन केली. संस्थेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोझा, शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.कस्तुरी तूळसकर हिने सुरुवातीला सुमधूर गायनाने सर्व गुरूंना 'गुरुवंदना' दिली. यानंतर शाळेचे सहा.शिक्षक सतीश वारंग यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगताना, गुरुचे आपल्या आयुष्यातील स्थान व महत्त्व, पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुशिष्यांच्या जोड्या याविषयी माहिती दिली.कु. विजय तुळसकर, कु. यशिता जाधव यांनीही गुरुपौर्णिमेविषयी माहिती दिली.
यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तालुकास्तरावर खेळांमध्ये विजयी झालेली कु.जान्हवी मडकईकर हिला भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच तालुकास्तरातील इतर खेळांमध्ये कु. लक्ष्मण कोंडुरकर, कु. मितेश मयेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले. इयत्ता सहावीतील कु. काव्या प्रदीप सामंत हिने मुंबई येथे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त केले. कु. इशिता फर्नांडिस हिने कुडाळ रोटरी क्लब मॅरेथॉन 5 किमी मध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला. या दोघांचेही शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं यश हेच या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना दिलेली गुरुदक्षिणा होती.
तसेच यावेळी शाळेला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास नेफडो या संस्थेमार्फत संस्थेच्या सिंधुदुर्ग महिला अध्यक्षा व प्रशालेच्या सहा.शिक्षिका पूजा गावडे यांस कडून वृक्ष वाटप करण्यात आले. "निसर्गाचे जतन करा, पर्यावरण वाचवा", "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका निधी तांडेल यांनी केले व आभार मानले.